टायर चोरांचा पर्दाफाश, पोलिसांनी केली कारवाई

Foto
एमआरएफ कंपनीचे रुपये ३. ७१ लाखांचे टायर, रुपये ४. ५० लाखांची पिकअप जप्त

माळीवाडा, (प्रतिनिधी) : दौलताबाद पोलीस स्टेशन हद्दीमधील एम.आर.एफ. कंपनीच्या गोडाऊनमधून टायर चोरी करणाऱ्या चोरट्यांना दौलताबाद पोलिसांनी जेरबंद करत चोरीस गेलेले टायर व गुन्ह्यात वापरलेली पिकअप जप्त केली आहे.

करोडी टोल नाका परिसरातील गोडाऊनचे शटर उचकटून १ ते २ सप्टेंबरच्या दरम्यान चोरट्यांनी रुपये ३.८७लाख किंमतीचे २६ टायर चोरी केले होते. या प्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पोउपनि वसंत शेळके हे करत
होते. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी १८ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी परिसरात सापळा रचून चार आरोपींना अटक केली. 

त्यांच्याकडून रुपये ३.७१ लाख किंमतीचे २३ टायर व रुपये ४.५० लाख किंमतीची महिंद्रा पिकअप जप्त करण्यात आली. अटक आरोपींची नावे अमोल रमेश देशमुख (रा. येवला), लियाकत नुर शेख (रा. सातारा गाव), योगेश प्रल्हाद भारती (रा. चिखली) व ऋषिकेश दादासाहेब गायके (रा. कन्नड) अशी आहेत.

ही कारवाई मा. पोलिस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त पंकज अतुलकर, सपोआ संजय सानप व पो.नि. श्रीमती रेखा लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि वसंत शेळके, अयुब पठाण, खुशाल पाटील, सुनिल घुसिंगे, सुनिल पठारे, डुमाले व चालक राठोड यांनी केली.